‘यशासारखे दुसरे यश नाही’ असे म्हणतात आणि म्हणूनच सर्वांगाने यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. इच्छाशक्ती थोड्यांना असते व इच्छित फलप्राप्ती तर फारच थोड्यांना होते.
यशाची व्याख्या कांहीशी व्यक्तीसापेक्ष असली तरी आपल्या ध्येयाची समाजमान्य मार्गांनी , लवकरात लवकर झालेली पूर्तता असे यशाचे ढोबळ स्वरूप असते. निवडलेल्या धेय्यानुसार त्याच्या पूर्ततेचे घटक बदलत जातात. व्यक्तीचे अंगीभूत गुण व मर्यादा, प्रयत्नांचे प्रमाण, इतरांचे सहकार्य, योग्य धेय्याची निवड व दैवाचा हात अशा अनेक गोष्टींवर आपली इच्छापूर्ती अवलंबून असते. या घटकांचे महत्त्व प्रसंगानुरूप व धेय्यानुरूप कमी अधिक होत जाते हे स्पष्टच आहे. परंतु यातील कोणत्याच घटकाचा संपूर्ण अभाव अथवा फक्त दैवयोगाने जगातील कोणतीच गोष्ट घडत नाही हे क्षणोक्षणी सिद्ध करता येणारे सत्य आहे. कर्तृत्वाचा बडेजाव आणि दैववादाची अगतिकता या दोन्ही भ्रामक गोष्टी आहेत. (याची जाण नसलेले बेगडी बुद्धिवादी तुम्हाला अपयशाच्या दरीत ढकलत आहेत…तरी वेळीच सावध व्हां !)
आपण जन्माला येताना पाच घटक बीजरूपी भांडवल म्हणून घेऊन येतो. शरीर, मन, बुद्धी,चित्त आणि विवेक (हे आत्म्याचे व्यक्त रूप).या पाच घटकांच्या सुयोग्य (धेय्यलक्षी )वापरालाच कर्तृत्व म्हणतात. (हे घटक कोणाला कसे मिळावेत हा प्रारब्धाचाच खेळ आहे.म्हणजेच कर्तृत्वाची सुरुवातच दैववादाच्या भूमीतून होते).
बुद्धिवादी सांगतात, दैव म्हणजे काय हे नीट कळल्यावर खरोखरीच दैव ही ‘घडवायची’ गोष्ट आहे की सोबतीला न्यायची गोष्ट आहे याचा अंदाज येईल. वर नमूद केलेले पाच घटक प्रयत्नांनी,सततच्या अभ्यासाने वृद्धिंगत आणि सक्षम करता येतात हे जरी खरे असले तरी या प्रयत्नांना शरीर, मन, वेळ , पैसा (साधनांची उपलब्धता )यांच्या प्रचंड मर्यादा असतात. इतरांच्या सहकार्यावरच आपले यश अवलंबून असल्यामुळे इतरांचे सहकार्य मिळेलच याची खात्री देता येत नाही(परत दैववाद आलाच). अनेक प्रसंगी सहकार्यापेक्षा स्पर्धात्मक प्रवृत्तीच समोर येण्याची शक्यता व्यवहारामध्ये अधिक असते. इतक्या सगळ्या अडचणींवर मात करत प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी यश दैवाधीनच राहते.कारण प्रयत्न करणारे अनेक पण यशाचे शिखर एक आसनीच असते. (परीक्षेत पहिले येणे लाखो प्रयत्नवाद्यांमधुनही एकालाच शक्य असते)देशाचा पंतप्रधान व्हायला अनेकांना, प्रत्येकालाच आवडेल व अशी आवड उघडपणे सांगणाऱ्या १०० प्रयत्नवाद्यांची प्रचंड धडपड आपण पहिली , कर्तृत्त्वाची पार्श्वभूमी गृहीत धरली तरी त्यातील ९९ जण पराभूतच होणार, अपयशी ठरणार हे दैवसिद्धच आहे.
समाजाच्या ‘समूह प्रक्रियेत’ आपण, आपले कर्तृत्त्व , आपले प्रयत्न यांना स्वतंत्रपणे महत्त्व नसून एकत्रित प्रक्रियेचा केवळ एक भाग म्हणूनच महत्त्व आहे याचे भान म्हणजे दैवाची जाण. उदा. परीक्षेत चुकून नापास झालेला विद्यार्थी गुणांच्या फेरतपासणीसाठी प्रयत्न करतो,परंतु अशी फेरतपासणी घेण्याचे गतवर्षीपासून आम्ही बंद केले आहे हा विद्यापीठाचा नियम त्याच्या स्वतंत्र कर्तृत्वाच्या आड येतो. या आड येण्याला दैव म्हणतात.विद्यापीठाने असा नियम का केला?तर अनेकांनी (समूहाने) या नियमाचा गैरफायदा घेतल्याचे लक्षात आले म्हणून , म्हणजेच समूहाच्या दुष्कृत्त्यांचा (म्हणजे नकारात्मक प्रयत्नांचाच ) एकाच्या कर्तृत्त्वावर विपरीत परिणाम झाला. प्रयत्नांच्या या अंगीभूत विसंगतींनाही दैवच म्हणावे लागेल.कर्तृत्त्वाचा , प्रयत्नांचा विषय निघाला रे निघाला कि दैव तेथे हजर होतेच. कारण “दैव आहे प्रयत्नांचीच सावली” हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. (सूर्यप्रकाश अडविल्याने सावली पडते तद्वतच प्रयत्नांमध्ये आडकाठी निर्माण होऊन दैव सावली प्रकट होते).
दैव ही प्रयत्नसापेक्ष गोष्ट आहे असे नव्हे, तर ती एक स्वतंत्र , स्वयंभू शक्तिरूप आहे आणि म्हणूनच कोणाला साथ द्यायची आणि कोणाला मात द्यायची याचं दैवाचं स्वतःचं असं गणित आहे. प्रयत्नवाद्यांचे सर्व कष्ट धुळीला एखाद्या कर्तृत्वहीन माणसाच्या झोळीत जावून बसण्याची करामत फक्त दैवालाच करता येते. गुणवत्ता व यश यांच्यातील तफावत सहज जाणवेल एवढे स्पष्ट असतानाही ‘यश मिळाले आहे त्याअर्थी तो गुणवानच असणार ‘ अशी भाबडी श्रद्धा , असा भाबडा दैववाद अनेक प्रयत्नवाद्यांच्या रोमारोमात भिनलेला असतो.
दैवाचं आणखी एक स्वयंभू वेगळेपण म्हणजे ‘अनुवांशिकता’. आई वडिलांच्या अन्य गुणदोषांप्रमाणेच दैवही त्यांच्या संततीकडे संक्रमित होते. वडिलांना त्यांच्या तरुणपणी वशिल्याने नोकरी लागली असेल तर मुलालाही….. त्याच्याकडे गुणवत्ता असली तरी, ओळखीतूनच नोकरी लागण्याचा योग येतो.
बारकाईने अनेक घराण्यांचे, कुटुंबाचे अवलोकन केल्यास कर्तृत्वहीन माणसांनाच दैवाची अधिक साथ लाभते असे स्पष्ट जाणवेल. कर्तृत्ववान माणसांना लाभते ती ‘संधी’ या संधीचे (व काहीवेळा संकटाचे संधीत रुपांतर करण्याचे) सोने करण्याची क्षमता हेच कर्तृत्वाचे खरे लक्षण असते.
कोणाला ‘किती मिळाले’ हे दैव व कर्तृत्वाच्या प्रमाणाचे परिमाण नसून ‘कोणाला’ किती सहज मिळाले, विनाकष्ट मिळाले हे दैवाचे द्योतक आहे. कोट्याधीश माणूस ‘सुदैवी’ असेलच असे नाही व भिकारी दुर्दैवी असेलच असे नाही. हा फरक दैव वापरणाऱ्या तसेच न वापरणाऱ्या कर्माचाही असू शकेल. खूप प्रयत्नांनी दैव बदलत नाही. दैव बदलाचे प्रयत्नच वेगळे असतात. दैवाबद्दल विलक्षण विसंगत अशी गोष्ट म्हणजे दैवाचा अभाव हाच दैवाचा प्रभाव (सुदैव) असतो. प्रयत्नांमुळे दैवाचं सहभाग कमी होतो. स्वरूप बदलत नाही.
व्यावहारिक प्रयत्न व दैवाचे स्वरूप बदलणारे अध्यात्मिक प्रयत्न यांच्या बेरजेतून कर्तृत्व फुलते, आश्वासक होते. ईश्वराचे अधिष्ठान नसलेले/नाकारलेले कर्तृत्व दिशाहीन , बेभरवशी असते. अशा कर्तृत्त्वावर तुमचाच काय दैवाचाही विश्वास नसतो.