आपल्या स्मृतीग्रंथातून ‘अध्ययन, अध्यापन,यजन , याजन,दान आणि प्रतिग्रह ही ब्राह्मणांची षट्कर्मे सांगितली आहेत. ही षट्कर्मे आजच्या काळाला अनुकूल विचार करून आचरली पाहिजेत.
अध्ययन ह्याचा अर्थ कुठल्याही विषयाचा , त्या विषयाच्या सर्व पैलूंचा सखोल अभ्यास आणि त्याविषयावर मूलभूत संशोधन , हे ब्राह्मण्य आहे.
अध्यापन ह्याचा अर्थ आपणास असलेले ज्ञान शिष्यांना देणे. आजच्या काळात शहाणे करून सोडावे सकळ जन हे समर्थ वचन प्रमाण मानले पाहिजे.सर्व विषयावर निपक्षपाती व राष्ट्रहिताच्या भूमिकेतून ब्राह्मणांनी समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे. समाजप्रबोधन हे ब्राह्मणांवर धर्माने सोपवलेले कार्य आहे, असे समाजप्रबोधन हे ब्राह्मण्य आहे.
प्राचीन काळच्या साहित्यात ब्राह्मणांचे वर्णन नेहमी आटपाट नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता असे आढळते. आटपाट नगरात गर्भश्रीमंत किंवा धनाढ्य ब्राह्मण कधीही राहत नसावा. हा ब्राह्मण धर्माचरणी होता , चारित्र्यवान होता , दरिद्री असून सुद्धा धनाच्या प्रलोभनाला बळी पडणारा नव्हता. आणि सत्तेपुढे झुकणारा नव्हता. आणि कदाचित म्हणून तो दरिद्री राहिला होता. (द्रोणसारखे अपवादही होते , पण ते कौरवांच्या पक्षात होते त्याचा आदर्श समाजाने आपल्यापुढे ठेवलेला नाही) आज सरकारी अनुदानासाठी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना अनुकूल असणारा अहवाल लिहून देणारे बुद्धीजीवी पहिले कि या दरिद्री ब्राह्मणाबद्दल अपार आदर वाटू लागतो. आजसुद्धा ब्राह्मणांनी दरिद्रीच राहावे असे कोणी म्हणणार नाही तर ब्राह्मणांनी निरलस पणे निरपेक्ष बुद्धीने धर्माचरणाने राष्ट्रहिताची भूमिका घेतली पाहिजे. परखडपणे मांडत राहिली पाहिजे , ही समाजाची ब्राह्मणांकडून अपेक्षा आहे.
आज ब्राह्मणांनी धनाच्या प्रलोभनाला बळी न पडणारा आणि सत्तेपुढे न झुकणारा असा प्रभाव पाडणारा एक ब्राह्मण विचार मंच किंवा अभ्यासगट स्थापन करण्याची आवश्यकता आहे. धर्माचरण, चारित्र्य, आणि राष्ट्रहिताची परखड भूमिका ह्या मुळे सत्तेला सुद्धा ब्राह्मण विचार मंचाचा धाक वाटला पाहिजे. माहितीचा अधिकार आज सर्वांच्या परिचयाचा आहे. माहितीच्या अधिकाराचे फायदेही अनेकांनी अनुभवले आहेत. तथापि , ह्या माहितीच्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे असे एक क्षेत्र आहे कि ते माहितीच्या अधिकारात येत नाही आणि ह्या क्षेत्राचा सर्वसामान्य , दैनंदिन जीवनाशी निकटचा संबंध असतो. असे हे क्षेत्र म्हणजे , शासनाचा धोरणे ठरविण्याचा आणि ती राबविण्याचा अधिकार.
शासनाने ठरविलेल्या आणि आखलेल्या धोरणाची सखोल चिकित्सा ब्राह्मण विचार मंचाद्वारे व्हावयास हवी. कृषी , गृहनिर्माण, वाहतूक,शिक्षण, न्याय, तंत्रज्ञान, राजकीय पक्षाचे धार्मिक धोरण, इत्यादी कुठल्याची विषयाच्या संदर्भातील शासकीय धोरणात समाजाचे हित किती ? अहित किती? योग्य काय? अयोग्य काय? ह्या गोष्टी समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे. आजच्या व्यापारीकरणाच्या काळात तर हि गोष्ट अत्यावश्यकच झाली आहे.
आज अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय्य धोरणावर प्रभाव पाडणाऱ्या बुद्धीजीवी वर्गाला “बॉस्टन ब्राह्मिंस’ असे संबोधतात. आपण जन्मजात ब्राह्मण असून सुद्धा कोठेही आपला प्रभाव पडत नाही. ब्राह्मणांचा असा विचार गट असणे हि काळाची गरज आहे. हे आजच्या काळाला आवश्यक असे यजन आहे. सर्वच ब्राह्मण संघांनी ह्या दृष्टीने एकत्र येण्याचा विचार करायला हवा. हे ब्राह्मण्य आहे आणि ब्राह्मणांना हे शक्य आहे.