ब्राह्मण संघटन – काळाची गरज
– माधव घुले
प्रस्तुत लेखाच्या शीर्षकातील प्रत्येल शब्दामध्ये फार मोठा अर्थ भरला आहे. ब्राह्मण या शब्दाच्या अनेक व्याख्या, संज्ञा, व्युत्पती यावर वर्षानुवर्ष कृतीहीन चर्चा व त्यावरून शब्दच्छल करण्यापेक्षा ज्ञानार्जन आणि ज्ञानदान हे ज्यांचे ब्रीद आहे, हाच ज्याचा धर्म आहे आणि हेच ज्यांचे जीवन आहे त्याला ब्राह्मण म्हणावं. अर्थातच कालानुरूप होणारे सामाजिक बदल आणि त्या त्या व्यक्तीचे आचरण यानुसार या संज्ञेत बदल संभवतात आणि ते स्वाभाविक अहे. अशी व्यक्ती पोटार्थी होणं, कांहीशी स्वार्थी होणं हेही स्वाभाविक आहे पण म्हणूनच त्याचं संघटन तितकंच आवश्यक अहे.
हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मनुष्यप्राणी कांही संस्कार उपजतच मिळवीत असतो तर जन्मानंतर त्यामध्ये वाढ होते ती माता-पिता व समाजाकडून. संस्कार ही अंगी बाणवायची गोष्ट असल्याने ते प्रत्यक्ष कृतीतूनच दृग्गोचर होतात,व्हायलां हवेत. ती कांही निव्वळ देण्या-घेण्याची वा गळी उतरवण्याची बाब नव्हे. पण तरीही ब्राह्मण कुळात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन आदर्श बनवण्यासाठी संस्कारांचा वसा घ्याला हवा. त्याने स्वतःबरोबरच समाजाचाही आदर्श व्हायला हवं. तथापि नेमका याच प्रवाहापासून सांप्रत दूर गेल्यामुळे संघटनेच महत्व त्यानी जाणून घ्यायला हवं, नव्हें ते त्याला पटवून द्यायला हवं.
समाजात आदर्श राहिलेच नाहीत
असा कांगावा आम्ही करतो
खर म्हणजे स्वतःच आदर्श व्हायचं असतं
याचा आम्हाला विसर पडतो.
संघटना म्हणजे एकी. एकीचं बळ, ताकद म्हणजे आत्मविश्वासाचं प्रकटीकरण. संघटनेमुळेच व्यक्तीला समाजाला दिशा मिळते, योग्य मार्ग मिळतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करतो. व्यक्ती व समाजापुढचे ध्येय सुस्पष्ट असावे. ध्येयपूर्तीसाठी अर्पणवृती लागते. आपली हिंदू संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. कोणत्याही व्यक्तीचा व समाजाचा विकास त्यागभावनेमुळेच होतो हे निश्चित.
स्वामी स्वरुपानंदासारख्या महात्म्यांचे तत्वज्ञान आपण आचरणात आणायला हवे. ते म्हणतात,
ध्येय असावे सुदूर की कधी न हाती यावे
जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे ।।
स्वतःबरोबरच आपलं कुटुंब ,शेजार, समाज आणि पर्यायाने राष्ट्राची उभारणी करायची तर त्यासाठी संघटन हे अत्यावश्यक आहे. ब्राम्हणांचं संघटन ही बाब कठीणच असं कदाचित गमतीनं वा उपरोधानं म्हटलं जातं पण ते एका अर्थी खरं आहे. चार विद्वानांना एकत्र आणणं किवा चार ब्राह्मण एकत्र जमवणं कठीण. कारण आपल्यातील मीपणा, मला काय त्याचे ही वृत्ती आपल्याला परस्परांपासून दूर ठेवते. या दोषांचं उच्चाटन आणि आम्ही वा आपण सारे याचं कृतीशील प्रकटीकरण याला अधिक महत्व धायला हंवं.ब्राह्मणांना संघटनेची गरजच नाही असं वाटावं अशी कृती अनेक ब्राह्मणांकडून निरंतर होते आहे हे वास्तव समजून घेऊन संघटनेची संकल्पना त्यांच्या मनात रुजवायला हवी.
घरातील यजमान जेवायला बसण्याआधी दारात कोणी याचक तर नाही ना याची खात्री करून मगच पानावर बसण्याची आपली संस्कृती आहे. हाच नियम जीवनातील प्रत्येक पायरीवर स्वतःला लागू करायला हंवा म्हणजे ख-या अर्थाने समाज एकत्र येईल. अन्यथा ‘ एकमेका सहाय करू’ चे नारे बोलण्यापुरतेच सीमित राहतात. म्हणजेच आपली वृत्ती बदलायला हंवी. अधिक डोळस व्हायला हंवं. विचारांना विवेकाची जोड घायला हंवी. अन्यथा बुद्धिवादाचं समर्थन करताना बुद्धिभेद करणारे बोलभांड समाजात अधिकाराने वावरतात. ब्राह्मणाने कसे वागायला हंवे यावर चर्चा करणारे अधिक, याचाच अर्थ ब्राम्हणांचं जीवन आदर्श आहे हे त्यांना मान्य आहे पण आव मात्र मोठा आणायचा आणि जाऊ तिथे व्याख्यानं झोडायची हे यांचे उद्योग. प्रश्न निर्माण करतांना त्याची उतर शोधून कृती करावी हे या पंडितांना ठणकावून सांगायला हंवे. जन्माने ब्राह्मण असणं ही तुम्हा आम्हाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे, तिचा वापर फार जबाबदारीने करायला हंवा. वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शक बनून उतराई होण्याचा प्रयत्न करायला हंवा. ब्राह्मण समाज सहिष्णू आहे पण अति सर्वत्र वर्जयेत् या न्यायाने संपादक महाशय केतकर ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ सारखे वागत आहेत आणि आपल्याच पत्रांतून स्वतःची मिरासदारी करतायत. हा पुरुषार्थ नव्हें, ब्राम्हणत्वही नव्हें.
काळ हे सर्व समस्यांवर सर्वात प्रभावी औषध आहे असे म्हणतात. ब्राह्मणाला अन्य समाजानी एकटं पडायचा प्रयत्न अनेकजण करीत आले, करीत आहेत पण ब्राह्मण म्हणजे असं रसायन आहे की समुद्रात नेऊन बुडवलं तरी बेट म्हणून वरती येईल. आपली वाट शोधणं आणि तीही आपणच हे तो पाण्यापासून शिकलाय. निसर्गाकडून मिळवणं आणि निसर्गाला परत देणं ही शिकवण त्याने अंगी बाणवली आहे. पण तरीही आपण बेसावध असता कामा नये. तुलनेनी शहरी ब्राह्मण खूपच सुरक्षित आहे पण खेड्यापाड्यातील ब्राह्मण तसा नाही.त्याला झळ लागते आहे, चटके बसताहेत. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहायला हंवं. काळाचा फटका त्यांना बसू नये याची खबरदारी प्रत्येक ब्राह्मणाने घ्याला हवी. ब्राह्मण ही समाजाची गरज आहे, आणि समाजाची घडी नीट बसव्ण्याचं कामही ब्राह्मण करतो. तो जन्माने ब्राह्मण आहे म्हणूनच हे अवधान त्याला असतं . गरजेपोटी सारेच एकत्र येतात पण तरीही टिकतो तो संस्कार, आचरण. तीच त्याची खरी ओळख.
अशा अनेक गुणांनी ब्राह्मण श्रीमंत आहे पण त्याने औदासिन्य झटकांवं, न्यूनगुंडातून बाहेर पडावं, अहंगंडाला तिलांजली द्यावी. तेज हे प्रकटल्याशिवाय राहत नाही. अंधारानी कितीही व्यापलं तरी ते मुळात असतंच; त्याचं प्रकटीकरण होणं तेवढंच बाकी असतं. ब्राह्मणाचा म्हणजेच ज्ञानाचा, संस्काराचा आदर करणं हे प्रगतीचं लक्षण आहे. कारण ब्राह्मण हा पृथ्वीतलावर राज्य करणारा अनिभिक्षित सम्राट आहे. ब्राम्हतेज आणि क्षात्रतेजांचं भगवान परशुरामांचं एकमेव उदाहरण याची साक्ष आहे.