कौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३

ज्ञातीसंस्थेचे काम करत असताना ज्ञातीबंधावांशी सातत्याने संपर्क ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे समजायला हवे. संघटन करताना केवळ एकत्र येणे एवढाच मर्यादित हेतू नसून ते टिकवणे, परस्परांमध्ये स्नेहभाव , आदरभाव निर्माण करणे , परस्परांच्या सुखदु:खांमध्ये सहभागी देणे, गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणे , विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या , तसेच नि:स्पृह्पणे चांगले समाजकार्य करणाऱ्या बांधवांचे यथोचित कौतुक तसेच वेळप्रसंगी वडीलकीची भूमिका घेवून उचित मार्गदर्शन करणे अशा सर्व बाबी संघटन कार्यामध्ये अनुस्यूत आहेत.

 
काळ झपाट्याने बदलतो आहे हे खरे आणि मानवी स्वभावही त्याला अपवाद नाही. विविध कारणांमुळे माणूस परस्परांपासून दुरावत चालला आहे. कुटुंबकलह वाढीला लागले आहेत. आपुलकीची जागा स्वार्थाने घेतली आहे. मी , माझं आणि माझ्यापुरतं ही वृत्ती वाढत चालली आहे. केवळ तरुण पिढीतच नव्हे तर सरसकट चंगळवाद फोफावतो आहे. आपली गरज जाणून ती संपल्यावर जे शिल्लक राहते त्यातील मोठा वाटा ‘नाही रे’ वर्गासाठी दिला जाणे हे भारतीय संस्कृतीचं अजोड लक्षण आहे.

 
चित्पावन ब्राह्मण तर षटकर्मी आहे. यजन-याजन, अध्ययन-अध्यापन आणि दान- अपरिग्रह अंगिकारलेले आपण समाजामध्ये अग्रणी आहोत याचा विसर पडता कामा नये. म्हणजे चित्पावन ब्राह्मण हा याचक नाही तर दाता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. माझं धन, माझं ज्ञान वा माझा घास यावर केवळ माझं अधिकार नसून त्यातील उचित वाटा हा समाजबांधवांसाठी आहे ह्याची जाण आपण ठेवली पाहिजे.

 
हा वाटा प्रत्येकाने आपल्या परीने उचलावा अथवा हा प्रत्येक घटक एका समूहामध्ये मिसळून जावा. ज्या चित्पावन ब्राह्मण संघाचा मी सभासद आहे, तो संघ माझा आहे, आपल्या सर्वांचा आहे, आपल्या सर्वांसाठी आहे ही भावना प्रत्येकाने जपावी. ‘आपल्या ज्ञातीचा उत्कर्ष साधणे अशी नोंद संस्थेच्या घटनेतील उद्दिष्टांमध्ये असते. ती कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरायला हवी. कारण प्रत्येक सभासदाची या उद्दिष्टाला बांधिलकी असते.

 
आपल्या ज्ञातीतील एकही व्यक्ती केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये , तिचे आरोग्य चांगले राहावे तसेच तिला किमान दोन वेळच्या अन्नाची भ्रांत राहू नये ह्याची जबाबदारी प्रत्येकाच्या वतीने आपल्या संस्थेने घ्यावी याच हेतूने गेल्या १८ वर्षांपासून वाढत्या प्रमाणात शैक्षणिक शिष्यवृत्ती , तसेच वैद्यकीय सहाय्य संस्थेतर्फे दिले जात आहे.

 
पण सारे कुटुंबच जर परीस्थितीशी सतत झगडणारे असेल तर अशा कुटुंबाला आधार देणे , स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांना आर्थिक पाठबळ देणे , कुटुंबातील व्यक्तीला नोकरी , व्यवसाय मिळवून देणे, आपल्यातील एक घास त्यांना देणे , या समाजात तुम्ही एकटे नसून आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा दिलासा त्यांना देणे ही खरीखुरी गरज आहे. हीच बाब लक्षात घेवून जून २०११ च्या सुमारास सर्वश्री दातार आणि परचुरे कुटुंबियांसमोरची आकस्मिक अडचण दूर करण्याचा त्वरित निर्णय घेतला आणि मासिक शिधा योजनेचा उपक्रम सुरु केला.

 
ही योजना २०११ च्या वार्षिक सभेपुढे ठेवली मात्र आणि त्याच दिवशी तीन सभासदांनी सहभाग दिला. त्यानंतर याची व्याप्ती वाढवताना कुटुंबाची नेमकी गरज, आपली क्षमता आणि उपक्रमाचे सातत्य याचा विचार करून टप्प्याटप्प्याने यामध्ये जोशी, पाटणकर, वैद्य, गोरे आणि लिमये अशा पाच गरजू कुटुंबाना सहभागी करून घेतले. यानुसार एकूण ७ कुटुंबाना त्यातील व्यक्तिगणिक प्रतिमास ५०० रु. एवढी रक्कम शिधा म्हणून दिली जाते. त्यातील कोणतेही कुटुंब सुस्थितीत येईपर्यंत हा शिधा देणे चालू राहिल.

 
यासंदर्भात समस्त चित्पावन ब्राह्मण सभासद व ज्ञातीबांधवांस आम्ही विनम्र आवाहन करू इच्छितो की , शैक्षणिक /वैद्यकीय निधीमध्ये आपली उचित भर घालताना मासिक शिधा योजनेमध्येही आपला आर्थिक सहभाग द्यावा. या योजनेसाठी प्रतिमास १८००० एवढी रक्कम दिली जाते. आजपर्यंत अनेकांनी आपुलकीचा सहभाग दिल्याने ही योजना चांगली मूळ धरत आहे. आपली देणगी संघाचे कार्यालयात (सोमवारखेरीज ) सायंकाळी ५ ते ८ या वेळात अथवा या योजनेसाठीचे आय.डी. बी. आय. बँकेचे बचत खाते क्रमांक ४५५१००१००१४२२६ वर संघाचे नावाने जमा करून कार्यालयामध्ये प्रत्यक्ष वा खालील दोन क्रमांकावर एस एम एस द्वारा कळवावे.

 
माधव घुले – कार्याध्यक्ष -९५९४९९६६४६

 
त्पावन ब्राह्मण संघ, डोंबिवली
१०२, वरदानश्री सोसायटी,केळकर पथ,
रामनगर, डोंबिवली (पूर्व)-४२१ २०१,महाराष्ट्र
[email protected]
[email protected]

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *