वेचक-वेधक
ब्राम्हण समाज – एक चिंतन
– श्रीराम गैसास
आजचा ब्राम्हण समाज आधुनिकता व परंपरा यांची सुयोग्य सांगड कशी घालावी याबाबत गोंधळलेल्या परिस्थितीत असावा असे वाटते. अर्थातच आजच्या काळातील घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत की ब्राम्हणच काय, समाजातीलच सर्व लोक आज संभ्रमित झाले आहेत. ही बाब आपणच आपल्याला जेव्हां त्रयस्थ अथवा दूरस्थ नजरेने बघू लागतो तेव्हां लक्षात येते.
या परिस्थितीला जबाबदार कोण याचा अधिक उहापोह करण्यापेक्षा, मला वाटते याला समर्थपणे तोंड कसे देता येईल याचा विचार करणे जास्त श्रेयस्कर आहे. जन्माने ब्राम्हणत्व ही तर खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. पूर्वजांकडून मिळालेले ब्राम्हणवृत्तीचे जनुक व समाजाकडून आपोआपच मिळणारी श्रेष्ठ वागणुक या गोष्टी इतर समाजबांधवांच्या दृष्टीने खरोखरंच हेवा वाटायला लावण्यासारख्या आहेत. पण या गोष्टींचे सातत्य टिकवण्यासाठी आजचा ब्राम्हण समाज खास काही करतो असे दिसत नाही. ज्या समाजाने दिशा दर्शन करायचे तोच आज मार्ग चुकल्यासारखा वर्तन करत आहे . आपण योग्य जिवनक्रमणा करीत नाही याची जाणीव ज्या समाजाला नसते त्याचा भवितव्याची काळजी वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते.
धर्माचरण , ज्ञानदान व संपतीचा अपरिग्रह या ब्राह्मणाच्या पूर्वापार ठळक वैशिट्याची शिकवण आज ब्राह्मण घरात दिली जात नाही असे दिसते . त्याचे एक कारण,या मूल्यांची घसरत चाललेली प्रतिष्ठा. ब्राह्मणत्वाची ही मूल्ये आजच्या काळात पाळणे अवघड जरूर आहे पण अशक्य नाहीत . म्हणूनच अशा मूल्यांचे जतन व वृद्धी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना योग्य ती प्रतिष्ठा मिळवून देणे सर्वप्रथम जरुरीचे आहे.
आधुनिक विज्ञानामुळे मानवी मूल्यांचे बाजारीकरण झाले आहे. आधुनिकतेच्या प्रभावामुळे लहान असो वा थोर, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक गोष्टीचे मुल्यांकन करायला जणू कांही अधिकारच मिळाला आहे, त्यामुळे परंपरा झपाट्याने मोडीत निघत अहेत.पण परंपरेची जागा दुसऱ्या कशानेही न घेतल्यामुळे एक आधुनिक विज्ञान व नवनवीन गोष्टींचे शोध लावून मानवाला अधिकच भ्रमिष्ट करून त्याला खऱ्या सुखापासून वंचित करीत अहे.
अशा परिस्थितीत परंपरा व आधुनिकता यांची सांगड असलेली जीवनप्रणाली आचरणात आणून ती समाजासमोर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे आणि हे काम ब्राह्मण समाजातील व्यक्ती अथवा यांचेकडून घडेल असा विश्वास वाटतो व तेच आपल्या परंपरेला धरून होईल.