थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधीस भेट – हरी सखाराम चितळे आणि मधुसूदन वामन दाबके – ऑक्टोबर २०११ ते डिसेंबर २०११

रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळास भेट देण्याचे गेली काही वर्षे डोक्यात घोळत होते. यापूर्वीच अ. भा. चित्पावन ब्राह्मण महासंघाचे कार्यवाह श्री. माधव घुले यांचेसह महासंघातर्फे सर्वांनी जायचेही ठरत होते पण तशी वेळ आली नाही. त्यातच सन २०१२ मध्ये नर्मदा प्रकल्पांतर्गत होत असलेल्या वेगवेगळ्या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात होणार असल्याचे वाचनात आल्याने व त्यामुळे समाधी स्थळ पाण्यात बुडणार या शंकेने समाधी स्थळास भेट देण्याच्या विचाराने आणखीनच उचल खाल्ली. मात्र ह्या वर्षी २८ एप्रिल (बाजीराव पुण्यतिथी) रोजी तेथे उपस्थित राहण्याचा मानस होता. तथापि कडक उन्हाळ्याचा ताप वाचविण्यासाठी आम्ही ७ ज्येष्ठ (६५ ते ७५ ) २४ मार्च, २०११ रोजी सकाळी टाटा विंगर या ९ सीटर ए सी गाडीने रावेरखेडी येथे जाण्यासाठी निघालो.
समाधी स्थळास नक्की कसे जायचे याची कोणालाच नीटशी कल्पना नसल्याने बेत ठरवताना प्रत्येकाच्याच मनात काहीशी धाकधूक होती. तथापि श्रीमंत बाजीराव पेशवा (प्रथम)प्रतिष्ठान चे श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी (बांगर) रा. इंदूर यांचेशी झालेल्या चर्चेने व श्री. शरद बोडस यांचा १९९८ मध्ये पुण्यतिथी कार्यक्रमास गेल्याबाबतचा लेख मिळाल्याने शिवाय चर्चेच्या वेळी श्री. कुलकर्णी यांनी दाखविलेल्या फोटोंमुळे ,तेथे जावून नक्की काय पाहावे लागणार आहे कोण जाणे ? ही शंका सुद्धा दूर झाली.

 
जाताना बुऱ्हाणपूर मार्गे जायचे ठरविले असल्याने वाटेत नेवासे येथील ज्ञानेश्वरी मंदिर व मोहिनीराज मंदिर ; देवगड येथील दत्ताचे स्थान व मुक्ताईनगर (पूर्वीचे एदलाबाद)येथील मुक्ताबाईची समाधी पाहून रात्री बुऱ्हाणपूर येथे हॉटेल पंचवटीत मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ मार्च ला बडवाह रस्त्याने सुमारे ७० कि.मी. वर असणाऱ्या सनावद या मोठ्या शहरात आलो. त्यानंतर मुख्य रस्त्याच्या दक्षिण-पश्चिम दिशेने जाणाऱ्या खरगोन रस्त्याने सुमारे १५ कि. मी. वर असणाऱ्या बेडशी गांवी आलो. गांव संपल्यावर उजवीकडे भोगाव निपाणी या खेडेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो व पुढे लगेचच पुन्हा उजवीकडे वळलो. हा रस्ता रावेर – खेडीस जातो. बेडशी ते रावेर-खेडी हे अंतर सुमारे ७-८ कि. मी. असून रस्ता कच्चा आहे. वाटेत खड्काई नदी लागते. आता त्यावर कॉजवे बांधलेला आहे. रावेर आणि खेडी ही प्रत्यक्षात दोन खेडेगावे असून ती रावेर-खेडी या जोडनावानेच ओळखली जातात. समाधी स्थळ प्रत्यक्षात रावेर या नर्मदेकाठच्या खेडेगावात आहे. खेडी हे खड्काई काठी आहे. सनावद सोडल्यापासून ‘बाजीराव समाधी स्थळाकडे’असे फलक कोठेही दिसत नाहीत याचे वाईट वाटले.

 
कॉजवेपाशी आल्यावरच आम्ही समाधी स्थळास कसे जावयाचे यासंबंधीची विचारपूस सुरु केली. खरोखरच आमचा योग चांगला म्हणा किंवा समाधी स्थळास भेट देण्याची आंतरिक ओढ म्हणा, आमची गाडी पाहून एक गावकरी देवदूतासारखा धावतच आमच्यापाशी आला व म्हणाला ‘चला मी तुम्हाला तिकडे घेवून जातो, मीच तेथील व्यवस्था पाहतो’ त्याला गाडीत घेऊनच आम्ही पुढचा १०-१५ मिनिटाचा प्रवास खेडेगावच्या व वळणावळणाच्या रस्त्याने पार केला व समाधी स्थळापाशी येऊन पोहोचलो, ऐन दुपारी १२ च्या सुमारास. बुऱ्हाणपूर ते रावेर या प्रवासास सुमारे ३II ते ४ तास लागले. रावेर – खेडी पूर्वीच्या पश्चिम निमाड या जिल्ह्यात होते. आता पश्चिम निमाड व पूर्व निमाड हे जिल्हे एकत्रित करून खरगोन जिल्हा झालेला दिसतो.

 
समाधी स्थळाची जागा विस्तीर्ण असून (सुमारे १ एकर) बऱ्यापैकी स्वच्छता आहे. स्मृती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गेल्या २-३ वर्षात येथे बरीच विकासकामे झालेली आहेत. त्यामुळे समाधी स्थळाच्या विस्तीर्ण जागेभोवती (नदीकडील हद्द सोडून) कंपाऊंड असून दर्शनी भागात मोठे लोखंडी गेट आहे. आत गेल्यावर तटबंदीतील प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपण प्रत्यक्ष समाधीपाशी पोहोचतो. पूर्वी केवळ चबुताऱ्याच्या स्वरुपात असलेल्या समाधीच्या जागी आता रीतसर षटकोनी आकाराची छत्री बांधलेली आहे. त्यावर खालील अर्थाचा मजकूर इंग्रजीत लिहिलेला आहे.

 
‘इ.स. १७४० मध्ये मृत्यू पावलेल्या बाजीराव पेशवा यांची रक्षा हा छत्रीत आहे अशी श्रद्धा आहे. ‘

 
मूळ समाधी राणोजी शिंदे यांनी बांधलेली होती.

 
आम्ही जाताना बेडशी गावातून हार, फुले, नारळ , उदबत्ती इ. पूजेचे साहित्य घेतले होते. यथासांग पूजा करून (पाय भाजत असताना) सर्वजण समाधी स्थळापाशी नतमस्तक झालो.

 
समाधी स्थळाच्या सभोवती तटबंदी (सुमारे १००’) असून त्यात सुमारे १५’ ते २०’ रुंदीच्या ओवर्या आहेत. समाधी स्थळ तटबंदीच्या मध्यभागी नसून एका बाजूस (नदीकडच्या)आहे. तटबंदीतील समाधी स्थळाच्या भोवती असलेल्या संपूर्ण चौकाला कोबा केलेला आहे. समाधीस्थळाच्या उजव्या बाजूच्या ओवरीत दोन फलक ठेवलेले आहेत. एक फलक ‘जनपद पंचायत बडवाह जिल्हा खरगोन म. प्र.’ यांच्या सौजन्याने तयार केलेला असून त्यावर ‘पेशवा बाजीराव प्रथम-संक्षिप्त जीवनी’ असे शीर्षक आहे. त्यावर बाजीरावाचे आपल्याकडे प्रचलित नसलेले चित्र बघावयास मिळते. (हुक्का ओढताना) या फलकावरील सर्वात महत्त्वाचा मजकूर खाली जसाच्या तसा देत आहे.

 
विजय का विवरण :- मालवा , गुजरात , दक्षिण के सुबेदारों एवम् निजाम तथा दिल्ली के बादशाह और पुर्तगालियों को हराया , गुजरात को गायकवाड,ग्वालियार को शिंदे (सिंधिया), नागपूर को भोसले, धार को पवार, इन्दौर को होळकर सरदारों के अधीन करके मराठा संघ बनाया.

 
दुसऱ्या फलकावरील मजकूर तसाच आहे. फक्त तो ‘स्मृति प्रतिष्ठान’ ने तयार केलेला असून त्यावर पुण्यातील शनिवार वाड्यासमोरील बाजीरावाच्या अश्वारूढ पुतळ्याचे चित्र आहे.

 
या दोन फलकांखेरीज येथे बाजीरावाची माहिती सांगणारी कोणतीही चित्रे अगर माहिती नाही.

 
समाधी स्थळाच्या उजवीकडील ही ओवरी नदीच्या बाजूस असल्याने त्यात खिडक्या ठेवल्या आहेत.

 
तटबंदीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गच्चीवर जाण्यासाठी जिने आहेत. गच्चीवर गेल्यावर एकदम पुण्यातील पर्वतीवरील शंकराच्या मंदिरातील गच्चीची आठवण झाली. गच्चीवरून समोरच्या टेकडीवरील छोटेसे रामेश्वर मंदिर , नर्मदा नदी व इतर परिसराचे दर्शन होते.

 
तटबंदीचे मूळ काम अहिल्याबाई होळकर यांनी केलेले होते. तटबंदीच्या बाहेर(कंपाऊंडपर्यंत) दर्शनी भागात व डावीकडे बऱ्यापैकी मोकळे आवार आहे व ते स्वच्छ ठेवलेले आहे. दर्शनी भागात एक मोठे पिंपळाचे झाड असून पारावर छोटेसे मारुतीचे देउळ आहे.

 
समाधी स्थळ आत्तासुद्धा नदीपात्राच्या पातळीपासून पुरेसे म्हणजे सुमारे ३० फूट ते ४० फूट उंच आहे. नर्मदा नदीवरील घाटाची मात्र दुरवस्था झालेली आहे. पण जो काही भाग शिल्लक आहे त्यावरून सुद्धा तो पूर्वी किती सुबक आणि सुंदर असावं याची कल्पना येते. नदीला पाणी जास्त नव्हते. पण पाणी एवढे स्वच्छ होते कि आश्चर्याच वाटले. पायऱ्यांवर शेवाळ्याचा लवलेश सुद्धा नव्हता. पायरीवर उतरून हातपाय ,चेहरा स्वच्छ धुवून तरतरीत झालो. व नर्मदेतले गोटे जमा करून घाटावरून परतलो. उन खूपच वाढल्याने आजूबाजूचा परिसर मात्र बघता आला नाही.

 
समाधीस्थळावर समाधीला भेट देणाऱ्या लोकांची नोंद ठेवण्याची काहीच व्यवस्था नसल्याने वाईट वाटले. अर्थात त्यावेळी समाधीस्थळावर आमच्याशिवाय कोणीही नव्हते. त्यामुळे अशी वही ठेवण्याने त्यामागचा उद्देश कितपत सफल होईल ह्या बाबत शंकाच आहे.

 
तथापि ते स्थान प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा गेली काही वर्षे मनात बाळगून होतो ती पूर्ण झाल्याने प्रत्येकाच्याच मनात कृतार्थतेची भावना होती. ज्यासाठी एवढा अट्टाहास धरला होता तो सफल झाल्याने खरोखरच सर्वजण भारावून गेले होते. परतताना छावणीचे अवशेष (काम व छोटी भिंत) बघायला मिळाली.

 
समाधीस्थळाच्या दर्शनाने सगळ्यांचीच मने आनंदाने भरून गेलेली असल्याने कच्च्या रस्त्यावरील परतीचा प्रवास कधी संपला व बेडशी गावात कधी येवून पोहोचलो हे समजलेच नाही.

 
समाधी स्थळ ‘याची देही याची डोळा’ बघितल्याचा आनंद व समाधान जेवढे होते तेवढ्याच तीव्रतेने एका गोष्टीची खंत होती. ती अशी की , गेली २-३ वर्षे वगळता एवढ्या मोठ्या संख्येने लढाया करून अपराजित राहिलेल्या ह्या पराक्रमी मराठी योद्ध्याचे समाधी स्थळ गेले कैक वर्ष किती दुर्लक्षित राहिले होते. स्मृति प्रतिष्ठान च्या पुढाकाराने गेल्या २-३ वर्षात झालेली विकास कामे खरोखरच कौतुकास्पद आहेत. समाधी पाण्यात बुडू नये म्हणून स्मृति प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश येवो हीच ईशचरणी प्रार्थना. त्यांच्या कार्यात आपण काय हातभार लावू शकतो याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. नुसते एका रस्त्याला नाव दिले किंवा शनिवारवाड्यासमोर पुतळा उभारला म्हणजे आपले बाजीरावांप्रती असलेले महाराष्ट्रातील इतिकर्तव्य संपले असा विचार करणे फारच खुजेपणाचे ठरेल असे वाटते. किमानपक्षी आपण महाराष्ट्रातील मराठी लोक किंवा सुरुवातीला फक्त पुण्यातील मराठी लोक मोठ्या संख्येने समाधी स्थळास भेट देवू लागले तरी स्मृति प्रतिष्ठानच्या कार्यात अप्रत्यक्षरित्या हातभार लागू शकेल.

 
मूळ उद्दिष्ट जरी बाजीराव समाधीस भेट देणे असे होते तरी इतक्या लांब इन्दौर जवळ आल्याने आम्ही २५ मार्च ला ओमकारेश्वाराला जावून मुक्काम केला.(नर्मदा रिसोर्ट एम. पी. टी.डी.सी.) २६ मार्च ला महेश्वर बघून इंदूर ला आलो. वाटेत महूच्या अलीकडे विन्ध्य पर्वत रंगात डोंगरमाथ्यावर असलेले भगवान परशुरामांचे जन्मस्थान असलेले (जानपावा) बघितले. २७ मार्च ला मांडवगड व उज्जैन केले व इंदूरला आम्ही हॉटेल अॅम्बेसिडर मध्ये मुक्काम केला. २८ मार्च ला सकाळी धुळे, मालेगाव नगर मार्गे रात्री १२ वाजता पुण्यात पोहोचलो. वाटेत मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या हद्दीवरील विजासनी देवीचे मंदिर पहिले.

 
संपूर्ण प्रवासात भीती वाटत होती तेवढा उन्हाचा त्रास झाला नाही. उलट धुळयातच उन्हाचा चटका जास्त जाणवला. या दौडीत जे सात वेडे ज्येष्ठ सामील झाले होते ते पुढील प्रमाणे

 
सर्वश्री हरी सखाराम चितळे, अरुण जगन्नाथ देवस्थळे, पुरुषोत्तम एकनाथ काशीकर, मधुसूदन वामन दाबक , श्री. अनिल व्यासो जोशी, गोविंद गंगाधर केतकर, कुन्दनकुमार साठे.

 
बाजीराव समाधीस्थळास भेट देण्यासाठी जे जावू इच्छितात त्यांनी पुण्याहून इंदूरला रेल्वेने अगर बसने जावे. इंदूरहून छोट्या गाडीने बडवाह मार्गे ओम्कारेश्वरास यावे. व दर्शन करून दुपारी सनावद मार्गे रावेर खेडीस यावे. (ओमकारेश्वर-सनावद- रावेरखेडी अंतर सुमारे ३५-४० कि.मी. ) म्हणजे संध्याकाळच्या वेळी उन्हाचा त्रास होणार नाही. समाधीस्थळ पाहून रात्री मुक्कामाला परत इंदूरला जावे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *