इंग्रजांनी या देशात पाय रोवले त्या काळापर्यंत बहुतांशी ब्राह्मण समाज शेतीनिष्ठ होता. काही थोडे लोक युद्धनीती, विद्याव्यासंग, ब्राह्म्कृत्य, वैद्यक व इतर उद्योगांमध्ये होते. बलुतेदारी उद्योग ब्राह्मण करत नव्हते. पण शेती अत्यंत निष्ठेने करणारे होते. इंग्रजांनी भारताची शिक्षणपद्धती बदलली आणि त्यांना जास्तीत जास्त महसूल गोळा करणारे कारकून हवेत म्हणून वेगळी शिक्षणपद्धती आणली. हा समाज वेगाने त्याकडे आकर्षित झाला. पुस्तकी काव्यशास्त्रविनोदात रमू लागला. इंग्रजी ते चांगले अशी भावना या समाजात वेगाने पसरत गेली. व शेतीपासून हा समाज दूर होऊ लागला. शेती करायला दुसऱ्याला सांगून पैसा मिळवण्यासाठी स्वतः चाकरी करू लागला. कारकुनी, मध्यमवर्गीय ऐषआरामाची सवय त्या काळात अंगात भिनू लागली. हळू हळू जमीन कसण्याचे काम इतर वर्गाकडे गेले व ब्राह्मण कृषीपराङ्मुख होत होत शहरी सुखसोयींच्या आकर्षणात गुरफटत गेला.
महात्त्माजींच्या हत्येनंतर या समाजावर लादलेल्या अत्याचाराने एकदम खचल्यासारखी स्थिती आली. १९५६ साली कुळकायदा लागू झाल्यावर बरीच मंडळी आपल्या जमिनी घालवून बसली. शेती सोडल्याने अटळपणे शहराकडे वेगाने वाटचाल करू लागली. परंतु, अनेक क्षेत्रात पाय रोवताना उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये हा समाज प्रगती साधत आहे. जीवरसायन विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स , अवकाश, आयुर्वेद या सर्वच क्षेत्रात समाजातील बांधवांनी प्रचंड प्रगती केली आहे.
दुर्लक्षित शेती आणि पर्यावरण
स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांच्या जमिनी ज्या लोकांना मिळाल्या त्यांनी या संधीचे सोने केले नाही. त्यांनी त्या जमिनीतील झाडे तोडून जमिनी विकून, रासायनिक शेती करून , वीजचोरीपासून कर्जे बुडविण्यापर्यंत नाना उद्योग करून जमिनी बरबाद केल्या व शेती क्षेत्राकडेही पूर्ण दुर्लक्ष केले. शेतीच्या हलाखीच्या स्थितीचे मुख्य कारण म्हणजे , या नवीन शेतमालकांना स्वत:चा स्वतंत्र विचार करण्याची कुवत नव्हती , कोणाच्यातरी आधाराने, विचाराने , किंवा लाटेने शेती करणे ,प्रचंड पाणी उपसणे , जमीन नष्ट झाली तरी चालेल पण माझा आज चांगला हवा ह्या विचाराने त्यांनी शेतीचा ह्रास घडविला आहे. व्यसने केली आहेत, कर्मनिष्ठा सोडून राजकारणामध्ये ते हरवले आहेत. जे ब्राह्मण खेड्यात शिल्लक राहिले त्या पैकी या गैरप्रकारात फारसे नाहीत. सर्वसमावेशक शुद्ध विचारधारा असणाऱ्या ब्राह्मण समाजात ते प्रमाण अत्यंत कमी आहे.
आज जगभर पर्यावरणाच्या समस्या उग्र होत चालल्या आहेत . शेती क्षेत्रातील समस्यांनी शेतकरी समाज वैफल्यग्रस्त झाला आहे. ह्या परिस्थितीत चांगले अन्न, पाणी , हवा हे मिळण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न हवे आहेत. रासायनिक शेतीने अन्नधान्य, भाजीपाला, फळे हे सर्वच विषारी बनविले आहे. रासायनिक खतांमधील क्षारांनी पाणी प्रदूषित केले आहे. विषारी कीडनाशकांच्या फवाऱ्यानी हवा सुद्धा प्रदूषित आहे.निसर्गातून बागडणारी फुलपाखरेच काय , बऱ्याचशा पक्षांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. आधुनिक शेतीपद्धतीने निसर्गाची, पर्यावरणाची व जैवविविधतेची मोठी हानी केली आहे. आपण आपली मूळ भारतीय कृषीपद्धतीच विसरलो आहोत.
ब्राह्मण समाज आणि शेती:
ब्राह्मण समाजाने शेती या विषयाकडे देखील पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. गोवंश आधारित सेंद्रिय शेती हे हजारो वर्षांपासून चालत आलेले शेतीचे तंत्रज्ञान पुन्हा रुजविण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त सूर्यशक्ती हिरव्या पानांनीच गोळा करता येते यास्तव ती गोळा करून उत्पादन करण्याची गरज आहे. या सर्व विषयांची वेगवेगळी मॉडेल्स उभी करण्यासाठी आपणच पुढे आले पाहिजे. अन्न हे शेतीतूनच निर्माण होते. जीवनावश्यक सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य शेतीमध्येच आहे. कितीही नोटा मिळाल्या , कितीही औद्योगिक प्रगती झाली असे वाटले तरी अन्नासाठी व दुधासाठी भूमातेवर व गोमातेवर आपण अवलंबून आहोत ही जाणीव मनात ठेवावी. शेतीमध्ये श्रम करावे लागतात व श्रमाची प्रतिष्ठा जपणे हे आपले कर्तव्य आहे. उत्तम शेती हे सुद्धा विज्ञान आहे. अनुवांशिक बुद्धिवैभव असणारा ब्राह्मण समाज ह्यामध्ये लक्ष घालू लागला तर संपूर्ण शेतीक्षेत्राचीच भरभराट होऊ लागेल हे निश्चित आहे.
कामाची दिशा :
आता शेती हा विषय आमच्यापासून दूर मागे राहिला आम्ही काय करणार? ते दोर तुटले…..असे कदापि मानू नये.आज जे ब्राह्मण शेतीपासून विभक्त होऊन शहरात स्थिरावले आहेत ते या विषयात खालीलप्रकारे योगदान देवू शकतात –
१. आपल्या नांवावर कोठे जमीन असेल तर शहरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग त्या जमिनीत प्रतिवर्षी घालावा. शेती म्हणजे धान्यपीक असे न ठरवता केवळ वृक्ष, फळबागा किंवा नुसती जंगले उभी करावी. पाच सहा वर्षात चांगली वनराई सर्वांना आकर्षित करेल. बागांच्या किंवा जंगलांच्या हिरवाईमुळे सूर्यशक्ती आणि प्रचंड जैवविविधता निसर्गतःच निर्माण होईल.
२. जर आपल्या जमिनीत सध्या शेती चालू असेल तर सेंद्रिय शेती , गोमाता, भूमाता हे फार मोलाचे विचार रुजवून त्या पद्धतीने कृती करावी. त्या जमिनीमध्ये पूर्णत: अरासायानिक शेती करावी. निर्धोक धान्य,फळे, भाज्यांचे उत्पादन होऊन समाजाचे आरोग्य टिकविण्यात हे मोठे योगदान असेल. त्या आग्रहापोटी कदाचित प्रारंभी एखादे वर्ष आर्थिक दृष्ट्या प्रतिकूल भासेल पण नंतर त्याचे महत्त्व समजू लागेल.
३. ज्या ब्राह्मण घरातील तरुण शहरात व म्हातारी माणसे गावात शेतीमुळे अडकून पडली आहेत, त्यांनी ती जमीन आपली आहे , पुढच्या पिढ्यात पुन्हा जमीन मिळणार नाही हे ध्यानात घेऊन त्या जमिनीत काय करावे याचे मार्गदर्शन घेऊन नियोजन करावे. दुसरे म्हणजे आपण ज्या वातावरणाशी जमवून घेत शहरी बनत जात आहोत ते करताना आपले मूळ स्थान आपली शेती व गांव आहे हे ध्यानी ठेवावे. शहाणा माणूस निर्धाराने पाय रोवून ठाकला तर त्या जागी आंबून,कुजून मातीत मिसळून जाईल पण उगीच भटकणार नाही. त्याच जागी आपले घरकुल आणि स्वर्ग यांच्यातील अनुबंध निर्माण करेल.
४. जर जमीनच नसेल व आर्थिक स्थिती चांगली असेल तर कोठेतरी किमान अर्धा एकर जमीन घेऊन त्यात वर्षाला २५००० रु. खर्च करून जंगल उभे करावे. ५-६ वर्षांनी ते उत्तम फार्म बनेल. व जीवनाचा आनंद मिळेल. आंतराष्ट्रीय कार्बन क्रेडीटचा भाग मिळेल.
५. सुबत्ता असलेले शहरी ब्राह्मण सहलीला जातात, खर्च करतात , निसर्गाच्या सहवासात राहतात, देव देव करतात, पर्यटन करतात , खरेदी केलेल्या किंवा आपल्या पूर्वापार चालत आलेल्या जमिनीतून आपण अशी सहल ५ वर्षे केली तर एकूणच त्या जमिनीमध्ये क्रांती घडेल. याचा परिणाम इतर समाजावरही होईल.योग्य संदेश जाऊन सर्वदूर शेतीक्षेत्रात प्रगती साधता येईल.
६. सर्व ब्राह्मणांनी आपल्या मूळ गावी जाऊन आपली जमीन आपल्या नावावर शिल्लक आहे का पहावे.,सात बारा उतारा घ्यावा.माहिती अधिकार व इतर सोपे नियम यासाठी उपयोगी आहेत. त्यावरून आपणांस वरील पद्धतीने काही करता येते का ते पाहावे.
७. अनेक ब्राह्मणांच्या जमिनी गावोगावी ओसाड पडल्या आहेत. मालकांचा ठावठिकाणा नाही किंवा स्थलांतर झाल्यामुळे या जमिनीला विसरले आहेत. परिस्थितीमुळे परत फिरून काही करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी त्या जमिनीचा शोध घेऊन आपल्या समाजातील कोणालातरी लागवडीखाली आणण्यास द्याव्या.
८. अशा जमिनी कसण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ट्रस्ट स्थापन करून त्या ट्रस्टींनी अशा जमिनींचा मालकांचा शोध घेऊन त्या जमिनी ट्रस्ट कडे वर्ग करून घ्याव्या. व आपल्या समाजातील बेरोजगारांना तेथे प्रस्थापित करावे , व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यास व नोकरीची मानसिकता यांचाही त्या कामी फायदा करून घ्यावा.
९. ब्राह्मण समाज हा बुद्धिमान आहे , आपली बुद्धी या विषयाकडे थोडीफार जरी दिली तरी आपले स्थान पक्के होण्याबरोबरच या वसुंधरेचे , या भारतवर्षाचे ऋण फेडल्याचे समाधान मिळेल.
ब्राह्मण संमेलन /अधिवेशन
बहुभाषिक ब्राह्मण संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्व नव्याने एकत्र येवू लागलो आहोत. सर्व स्पर्शी ब्राह्मण्य सांभाळणारा अनुवंशिकतेने बुद्धिवैभव असणारा व चांगल्या आचार विचारांनी घडलेला आपला समाज संख्येने अल्प असला तरी ब्राह्मतेजाचा स्फुल्लिंग प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. कितीही अत्याचार झाले तरी ‘केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे’या वृत्तीचा हा समाज आहे. प्रवाहाबरोबर वाहत जाणे हा मृत माशांचा गुणधर्म तर प्रवाहाविरुद्ध पोहणे हा जिवंत माशांचा.ब्राह्मण समाज हा मुळातच पापभिरू, खोट्याची चीड असणारा , आपल्या देशावर निस्सीम प्रेम असणारा , आपल्या धेय्यावर अढळ दृष्टी ठेवणारा असा आहे.
निसर्गाच्या विरुद्ध अनैसर्गिक जीवन जगण्याचा जगातील आज ठिकठिकाणच्या विचारवंताना वीट आला आहे. त्याउलट अत्याधुनिक विज्ञानाची सार्वजनिक पेरणी करून सर्वांनाच त्या विज्ञानाचा लाभ होईल असे नवीन कार्य उभे करणे सहज शक्य आहे. सर्व आधुनिक ह्या संदर्भाप्रमाणे करण्यात आलेली तंत्रे सर्वांगीण प्रगतीच्या नव्या स्वरूपात प्रबळ आर्थिक उभारणीला मोठा हातभार लावतील. प्रयोगवर्धी न बनता द्रष्टे प्रयोगदर्शी बनले पाहिजे. शाळा कॉलेजपासून वंचित झालेले जनसामान्य निसर्गाच्या कुशीत आपापल्या प्रगतीसाठी नवीन वाट शोधू शकले पाहिजेत. सुशिक्षित तरूणाएवढा बुद्धीदर्शकांक अनपढाकडेही असतो. कोणत्याही वयात कोणतेही ज्ञान मिळविण्याचा हक्क तो आपणास बहाल करत असतो. ब्राह्मण समाजाने शेती, वनशेती, पर्यावरण ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी वरील अनेक उपाययोजनांचा गांभीर्याने विचार करून काही पावले टाकणे आवश्यक आहे. आपल्या समाजातील अल्प किंवा मध्यम गुणवत्तेचे युवक हाताशी धरून निरनिराळे शेतीविषयक प्रयोग करत निसर्गाशी दोस्ती करत काहीतरी वेगळे घडवू शकतो याचा विश्वास बाळगावा व समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी हातभार लावावा.