भगवान श्री विष्णूंनी आपण त्रेता आणि द्वापार युगांच्या संधीकाली अवतार घेवू असे आश्वासन दिले होते त्यानुसार जमदग्नी व रेणुका हे दाम्पत्य आपल्या अवतारासाठी योग्य असे ठरवून श्री विष्णूंनी आदिशक्तीचे चिंतन करून रेणुकादेवीच्या पंचम गर्भात प्रवेश केला. आणि वैशाख शुद्ध तृतीयेला आदिती नक्षत्रावर परमज्योतिस्वरूप बालकाने रेणुकादेवीच्या उदरी जन्म घेतला. त्रिभुवन सर्वार्थाने प्रकाशित झाले. आश्रमातील वातावरण भारावून गेले. प्रत्यक्ष परमात्म्यानेच जन्म घेतल्याने ज्याच्या चिंतनात योगी रममाण असे परमात्मा निदर्शक ‘राम’हे नाव मात्यापित्यांनी ठेवले.
रामांच्या पाचव्या वर्षी जमद्ग्नीमहर्षींनी योग्य मुहूर्त पाहून वासिष्ठादी ऋषिगणांच्या उपस्थितीत उपनयन संस्कार केला व त्यांना ब्रह्मोपदेश दिला. रामानेही पित्याजवळ वेदशास्त्रे शिकण्यास प्रारंभ करून अल्पावधीतच आपल्या अग्रजाएवढी प्रगती केली. वयाच्या द्वादशवर्षापर्यंत राम सर्वविद्याविशारद झाले. या वयात रुपसंपन्न राम अग्नीप्रमाणे तेजस्वी, सागराप्रमाणे गंभीर व पृथ्वीप्रमाणे क्षमाशील भासत. त्यानंतर त्यांनी विद्यादात्या विघ्नेश्वराला प्रसन्न करून घेतले. तेव्हा ‘तू साक्षात विष्णू आहेस हे मला ज्ञात आहे, तुझी जी वांच्छा असेल ती मी आनंदाने पूर्ण करीन असे श्री गणेशांनी सांगितले. त्यानुसार दिव्य परशूच्या विद्येची इच्छा करताच संतुष्ट झालेल्या गणनायकाने रामांना प्रथम आपले आत्मस्वरूप दिले. आणि खऱ्या योगे शत्रुनाश होईल अशा परशुविद्येचे रहस्य विषद करून सांगितले. अशा रीतीने परशुची प्राप्ती आणि परशुविद्या ज्ञात झालेले भृगुकुलोत्त्पन्न भार्गवराम तेव्हापासून परशुराम म्हणून ओळखले जावू लागले.